logo

अजितदादा सुजय विखे यांच्यासाठी मैदानात, लंकेंनी पक्ष सोडल्यानंतर 4 एप्रिलला पक्षाचा पहिला मेळावा, विखे विजयाची रणनीती ठरणार !

अहमदनगर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याला सहकारात अग्रेसर बनवले. त्यांनी प्रवरा हा सहकारी तत्त्वावर चालणारा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना उघडला होता. तेव्हापासून जिल्ह्याने सहकार क्षेत्रात दमदार कामगिरी केलेली आहे.
दरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिणेत दररोज काही ना काही नवीन घडामोड पाहायाला मिळत आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी अजितदादा यांच्या गटाला दक्षिणेत मोठा हादरा बसला. निलेश लंके यांनी अजितदादा यांच्या गटाला राम राम ठोकला अन शरद पवार यांच्या गटात त्यांनी पक्षप्रवेश केला आहे आणि ते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
आता महायुतीचे सुजय विखे पाटील अर्थातच विठ्ठलराव विखे पाटील यांचे पणतू आणि पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात लोकसभेची लढत होणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी निलेश लंके यांनी शरद पवार गटात समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान ही गोष्ट अजितदादा यांच्या चांगल्याच जिव्हारी लागली असून त्यांनी आता याचा वचपा काढण्यासाठी पक्षाच्या जिल्ह्याच्या नवीन अध्यक्षाची नियुक्ती केली आहे. पक्ष जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नाहाट यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वात आता महायुतीचे नगर दक्षिणचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
बाळासाहेब नाहाट यांची अजित दादा यांचे खंदे समर्थक अन शिलेदार अशी ओळख आहे. खरे तर अजित दादा यांनी जेव्हा राष्ट्रवादीत बंड पुकारला त्यावेळी निलेश लंके हे त्यांच्यासोबत होते. पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.
ते आता शरद पवार यांच्या गटात आहेत. लंके यांना थांबवण्याचा अजितदादांनी प्रामाणिक प्रयत्न देखील केला होता. मात्र लंके यांनी अजितदादांचे ऐकले नाही यामुळे ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी आता जिल्ह्याच्या राजकारणात अधिक लक्ष घातले आहे.
महायुतीच्या उमेदवाराला अर्थातच सुजय विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी अजितदादा व त्यांचा पक्ष आता सक्रिय झाला आहे. दरम्यान, नवीन जिल्हाध्यक्षाची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच अजितदादा गटाचा पहिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
उद्या अर्थातच 4 एप्रिल ला हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन झाले असल्याचे बोलले जात आहे. केडगाव येथे सकाळी दहा वाजता हा मेळावा संपन्न होणार आहे. पक्षाचे नवीन जिल्हाध्यक्ष नाहाट यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.

4
1583 views